
संभाजीनगर (औरंगाबाद) – अजिंठा रोडवर चौका नावाचं एक गाव लागतं. चौक्याहून उजवीकडे एक छानसा वळणावळणाचा रस्ता जातो, आजूबाजूला छान हिरवीगार झाडी आणि चांगला पक्का रस्ता आपल्याला लहुगड-नांद्रा या गावी घेऊन जातो. लव-कुशांचा जन्म येथेच झाला असे म्हणतात, या गावाशेजारीच खामखेडा नावाचे गाव देखील आहे जिथे एका खांबाला लव-कुशांनी अश्वमेधाचा घोडा बांधला होता. याच खामखेडा आणि नांद्रा गावांमध्ये एक डोंगर आहे ज्याला नवलाईचा माळ असे म्हणतात. या भागातील ग्रामस्थांचं दैवत नवलाई मातेचे मंदिर या डोंगरावर आहे. खरंतर माळ म्हणजे पठार. आणि खरोखरच या डोंगरावर एक पठार तयार झालेलं आहे. हा डोंगर अजिंठा डोंगररांगांमधील आहे.
या माळावरून खाली छान नांद्रा गावाचे व त्याजवळील तलावाचे दर्शन होते.
माझा मित्र उमेश हा नांद्रा येथे राहतो. त्याच्या घरी आधी एकदोन वेळा गेलेलो पण प्रत्येक वेळेस गावातून हा डोंगर बघून मोह व्हायचा त्यावर जायचा. नवलाईच्या माळावर मला रात्रभर मुक्काम करायची खूप इच्छा होती, म्हणून मी उमेशला आणि एकदोन मित्रांना एक दिवस म्हंटल की आपल्याला आज माळावर मुक्काम करायचा आहे आपण जाऊया तिकडे. उमेश ने देखील लगेच मान डोलावली आणि आम्ही त्याचक्षणी संभाजीनगरहून (औरंगाबाद) नांद्रा ला जायला निघालो. थंडी चे दिवस असूनही त्या दिवशी गर्मी होत होती तरीही थंडीची तयारी म्हणून सोबत स्वेटर ठेवले होते. नांद्र्याला उमेशच्या घरी चहा पाणी झालं आणि छान ठेचा भाकरी बांधून घेतले व संध्याकाळी ७ ला आम्ही हाईक सुरु केला आणि तासाभरात माळावर पोहचलो.

नुकताच सूर्यास्त झाला होता, शुक्रतारा आकाशात चमकत होता आणि त्याच्या पाठोपाठ इतरही तारे हळू हळू आकाशात दिसायला सुरवात झाली होती आणि त्यासोबतच शहरातलं लाईट पोल्युशन पण दिसायला सुरवात झाली होती. चंद्रकोर पण छान दिसत होती आणि तेवढ्यात ती मावळली देखील. अंधार थोडा वाढला म्हणून आम्ही एक लहान शेकोटी पेटवली कारण थंडी तर नव्हतीच म्हणून त्यासाठी तिचा उपयोग होणार नव्हता.
साडेनऊ दहाच्या सुमारास आम्हाला चांगलीच भूक लागली मग उमेश च्या घरून घेतलेली शिदोरी उघडली मस्त मिरचीचा ठेचा आणि भाकऱ्या. त्या शेकोटी मध्ये आम्ही भाकऱ्या गरम केल्या आणि मस्तपैकी ताव मारला सोबत कांदा पण आणला होता तो फोडला आणि बेतच जमला. नॉर्मली १-२ भाकऱ्या खाणारा मी त्यादिवशी ४-५ भाकऱ्या हाणल्या…
नवलाईच्या मंदिराजवळ दोन पत्रे टेंट सारखे त्रिकोणी आकारात ठेवलेले होते. बहुतेक आधी कोणीतरी आला असेल तिथे मुक्कामाला, त्याने ते ठेवले असावे. त्या पत्र्याच्या टेंट मध्ये आम्ही bag आणि काही समान ठेऊन माळावर ११ वाजेच्या सुमारास शतपावली करायला निघालो सोबत कॅमेरा होताच मग ताऱ्यांचे फोटो काढायचे प्रयत्न पण केले तीन चार तास तो उपक्रम चालला.

रात्रीचे दोन तीन वाजले असतील, परत जाऊन झोपूया म्हणून परत फिरलो पण तेवढ्यातच काळविटांचा एक मोठ्ठा कळप आमच्या समोर आला. जवळपास ५०-६० काळविट असावेत. मी पहिल्यांदाच एवढे काळविट एकसाथ जंगलात पाहिले. वेगळाच अनुभव होता तो. जितक्या वेगात ते आले, तितक्याच वेगात दिसेनासे पण झाले. मग आम्ही आमच्या टेंट मध्ये परतलो, बाहेरच्या शेकोटीला परत काही लाकडं घातली आणि गप्पा सुरु झाल्या. अवकाश, तारे, काळवीट करत करत आम्ही भुतांच्या गप्पा करायला सुरुवात केली. उमेश ने याच माळावर घडलेले भुताटकी किस्से सांगितले अन आमच्या सुबत असलेल्या गजेंद्रची फाटायला सुरुवात झाली. मग एक एक करून भूत, पिशाच्च, डाकिनी असे सगळेच आयाम रंगवले. आमचे गजेंद्रभाऊ तर एक दोन गोष्टी ऐकूनच टेंट मध्ये जाऊन पांघरून घेऊन झोपून गेले. (पण त्याला झोप आली नसावी अशी माझी शंका आहे…)
रात्रभर गप्पा चालूच होत्या आणि तेवढ्यात सूर्योदय झाला. सकाळी परत निघालो पण लहुगडावर देखील जावं असा विचार केला आणि गडावरील रामेश्वरचं दर्शन घेतलं. लहुगड देखील पाहण्याजोगा आहे. सुमारे १५००-२००० वर्षापूर्वीचा तो गड. त्यावर रामेश्वरचं दगडात कोरलेलं देऊळ आहे. वर दगडात कोरलेलीच पाण्याची टाकं आहेत. त्याबद्दल नंतर कधीतरी एक पोस्ट लिहीलंच… गडावरून खाली गावात आलो. उमेशच्या घरी चहा घेतला आणि संभाजीनगर (औरंगाबाद) ला जायला परत निघालो.
हा प्रवास काही वेगळाच होता. अचानक मिळालेला पत्र्याचा टेंट, काळविटांचा कळप, भुताच्या गप्पा हे समीकरण कुठून जुळलं हे त्या नवलाई मातेलाच ठाऊक! पुन्हा एकदा त्या माळावर रात्री मुक्काम करायला जायची खूप इच्छा आहे. लवकरच जाईल पण कदाचित यावेळेस समीकरण वेगळं असेल सोबती वेगळे असतील पण मात्र अनुभव हा नेहमीप्रमाणेच रोमांचक आणि surprising असेल हे मात्र नक्की…!

Khupach chhan 👍
LikeLiked by 1 person
लेख छान आहे, पण 4-5 भाकरीआणि पराग हे समीकरण काही जुळ त नाही, म्हणजे मनाला पटत नाही, हो शक्य तेव्हाच होऊ शकतं, जेव्हा भुतांन झपाटले असेल
LikeLiked by 1 person
नवलाई मातेची कृपा…
LikeLike
भाई लेखामुळे सर्व प्रवास पुन्हा अनुभवाला मिळाला. प्रवासास तुमची सोबत असली तर अनेक अनुभव येतात.
LikeLiked by 1 person
उमेश, तुझ्यामुळे तर प्रवास अजूनच मजेदार झाला..
LikeLike
पराग भटकणे,नवीन माणसे जोडणे, नेहमी नवनवीन गोष्टींचा अभ्यास करणे हा पिढीजात उपजत गुण तू छान जोपासला चाकोरी मोडून छंद जोपासणे हे सगळ्यांना शक्य होत नाही. असाच पुढे जा आपला छंद जोपासा आणि मोठा हो
LikeLiked by 1 person