इंजिनिअरींगला सेकण्ड इयरला असताना एकदा सौरभ, सुरज आणि मी; आम्ही होस्टेल मध्ये बसून गप्पा करत होतो आणि इंजिनिअरींग होस्टेल च्या गप्पा म्हणजे कुठल्या विषयावर होतील ते देवाला देखील ठाऊक नसतं. गप्पा सुरु झाल्या त्या टाईम ट्रायवलच्या आणि मग त्याला जोडून कसे फिजिक्स चे नियम आहेत, आईनस्टाईनची रिलेटीव्हिटी, टाईम डायलेशन, अब्सोल्युट स्पीड असं सगळं बोलता बोलता आपण कुठे कुठे जाऊ शकतो टाईम ट्रायवल करून ते सुरु झालं. मग भारताच्या भविष्यात आम्ही जाऊन आलो आणि भूतकाळात जायची तयारी सुरु केली.
या भूतकाळाच्या प्रवासात कुठे जावं? हा प्रश्नच नाहीका?
१०० वर्षांपूर्वी गेलो तर इंग्रजांच राज्य!
३००-४०० वर्षांपूर्वी मुघल, कुतुब, निझाम, खिलजी!
जावं तरी कुठल्या काळात?
खरा भारत कुठे बघायला मिळणार ? ? ?
मग खिडकी बाहेर आमच्या विद्यापीठाचं नाव दिसलं….
“शिवाजी विद्यापीठ”
तिघांनी एकमेकांकडे बघितलं आणि काही न बोलताच ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जायचं. तिथेच आपल्याला खरा भारत अनुभवायला मिळेल.
मग आमच्या या टाइम ट्रायवल च्या प्रवासात आम्ही गेलो रायगडावर, आपल्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, काय ती रायगडाची महती, दुर्गराज रायदुर्गाचं सौंदर्य बघून कैलासाचं सुख प्राप्त होत होतं, स्वतः शिवशंकरांचा राज्याभिषेक होत होता. एकीकडे कवी भूषणांच्या कविता चालू होत्या…
१. जा पार सही तनै सिवराज सुरेस कि ऐसी सभा सुभ लाजे ।
जो कवी भूषण जंपत है लखी संपती को अलकापती लाजे ।
जा मधी तीनहू लोक कि दिपती ऐसो बढो गढराय बिराजै ।
वारी पाताल सी माची मही अमरावती कि छबी उपर छाजै ।
२. सक्र जिमी सैल पर । अर्क तम फैल पर ।
बिघन कि रैल पर । लम्बोदर देखिये ।
राम दशकंध पर । भीम जरासंध पर ।
भूषण जो सिन्धु पर । कुम्भज बिसेखीये ।
हर जो अनंग पर । गरुड ज्यो भुजंग पर ।
कौरव के अन्ग पर । पार्थ जो पेखीये ।
बाज ज्यो बिहंग पर । सिंह ज्यो मतंग पर ।
म्लेंछ चतुरंग पर । शिवराज देखिये ।
तर दुसरीकडे समर्थ रामदास स्वामींचे अभंग,
१. स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी
त्रैलोक्य चालिल्या फौजा, सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडीली मोठी, आनंदवनभुवनी
येथून वाढला धर्मु, रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी
भक्तासी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा
भक्तासी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी
येथूनी वाचती सर्वे, ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी
उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी
बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी
२.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।
नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।।
यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।।
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायी ।।
धीर उदार गंभीर | शूर क्रियेसी तत्पर |
सावधपणे नृपवर | तुच्छ केले ||
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।।
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ।।
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।
कित्येकांस आश्रय जाहला । शिवकल्याण राजा ।।
सगळीकडे आनंद साजरा होत होता, पोवाडे चाललेले, युद्धाची साहस वर्णनं चाललेली, कणाकणात उत्साह भरलेला. अश्या उत्साही वातावरणात सप्तसिंधुंच्या जलाने महाराजांचा अभिषेक झाला, महाराजांना राष्ट्राच्या शुद्धतेसाठी मंगल चिन्हांनी सजवण्यात आलं, राष्ट्राच्या रक्षणाचं प्रतीक म्हणून त्यांना भवानी तलवार, धनुष्यबाण, बिच्छवा वाघनखं, चक्र आणि गदा देण्यात आली. यातील प्रत्येक आयुध हातात घेतांना त्यांना त्यांच्या सोबत्यांची, त्यांच्या मित्रांची, त्यांच्या मावळ्यांची – शिलेदारांची आठवण येत होती, ज्यांच्यामुळे आज हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं होतं. महाराजांना त्या दिवशी अत्यंत अनावर पणे रडू आलं असणार, पण त्यांनी एक टिपूस देखील डोळ्यात येऊ दिलं नाही, कारण समोर होती रयत. आत्ता कुठे सुरुवात झालीये हे महाराजांना ठाऊक होतं, अजून खूप काही करायचंय, दक्षिणदिग्विजय, उत्तरदिग्विजय, गुरू गोविंदसिंगांची भेट, लचित बडफुकनांची भेट असं खूप काही. अखंड हिंदुस्थान एक करायचाय त्यासाठी धीराने घ्यावं लागेल, खुद्द जिजाऊंनीच त्यांना हे सांगितलेलं.
या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात पन्हाळा, विशाळगडाचे सैनिक आलेले, सोहळ्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सर्व धार्मिक विधी ते कुतूहलाने बघत होते, कित्येक शतकांनंतर हिंदू पद्धतीने राज्याभिषेक होत होता त्यामुळे गागाभट्ट संपूर्ण सभेला प्रत्येक विधीचा अर्थ समजावून सांगत होते, त्यामुळे सर्वांचे कुतूहल अजूनच वाढत होते आणि तेवढ्यात गागाभट्टांनी सभेला सांगितले की ही आता शेवटची विधी, धर्म दंडाने महाराजांच्या कपाळावर पाच वेळा स्पर्श केला जाईल आणि आपले महाराज सिंहासनारूढ होतील, हिंदुस्थानचे चक्रवर्ती सम्राट होतील. गागाभट्टानी धर्मदंड हातात घेतला आणि शिवरायांच्या कपाळाला पाच वेळा स्पर्श केला, पाचव्या स्पर्शाला महाराजांचे डोळे मिटले आणि एका क्षणात ते पावनखिंडीत जाऊन पोहचले, त्यांच्या समोर उभे होते बाजीप्रभू, महाराजांनी बाजीप्रभूंना कडकडून मिठी मारली आणि सांगितलं की, अहो बाजीप्रभू, आज पाच वेळा धर्मदंडाचा माझ्या कपाळी स्पर्श होत असताना मला तुमचाच आवाज ऐकू येत होता, “राजं, तुम्ही जावा पुढं, म्या खिंड लढीवतो. एकाबी गनिमास खिंडीच्या बाहेर जाऊ द्यायचो न्हाई मी. विशाळगडाला जावा अन तिकडे सुखरूप पोचले की तोफांचे पाच वार करा.” अहो बाजी, ह्या धर्मदंडाच्या पाच स्पर्शांनी मला त्या तोफेच्या पाच वारांची आठवण करून दिली आणि मन लगेच तुमच्याकडे वळलं. बाजींसोबत तिकडे तान्हाजी मालुसरे, शिवा काशीद यांच्यासोबत सर्वच शिलेदार, सैनिक, मावळे महाराजांपुढे आले आणि महाराजांना सिंहासनारूढ होण्याची विनंती केली. महाराजांचे डोळे उघडले, त्यांनी धर्मसंस्थापनेची आणि साधुंच्या परीत्राणाची शपथ घेतली, आणि महाराज सिंहासनारूढ झाले.
गागाभट्टांनी घोषणा केली,
“गोब्राम्हणप्रतिपालक, प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, महाराजाधिराज, भूपती, जळपती, गढपती, गजपती, हयपती, सुवर्णरत्नलांकराधिष्ठित श्रीपती, सिंहासनाधिश्वर, छत्रपती श्री शिवाजी महाराज…”
सर्वांचे डोळे पाणावले, आज आमचा राजा तख्तावर बसला, सम्राट झाला. जणू काही आपल्या घरातील व्यक्तीच सिंहासनारूढ झाली, सगळीकडे आनंदी आनंद झाला.
आम्ही देखील अत्यंत आनंदित झालो होतो हा रम्य सोहळा पाहून, त्याच आनंदात आम्ही भूतकाळाची रजा घेतली आणि वर्तमानात परतलो. आम्ही तिघेही सुन्न होतो, विचारात मग्न होतो, तेवढ्यात मी सौरभला विचारलं कि जाऊया का पावनखिंडीला? बाजींना भेटायला? सौरभ आणि सुरज दोघेही लगेच तयार झाले. पण जायचं कसं? कोल्हापूरहून डायरेक्ट बस करायची? कि पन्हाळ्याहून पावनखिंडीला पायी जायचं? जसे महाराज गेले होते? ठरलं तर मग, पायीच जाऊया, महाराज एका रात्रीत गेले होते तसं आपणही जाऊ शकतो ना…???
शनिवारी पहाटेच आम्ही निघालो पन्हाळ्यापर्यंत आपल्या एसटीने गेलो, सकाळी मस्त गरमागरम नाश्ता केला आणि निघालो पायी पायी पावन खिंडीच्या दिशेने…

पावनखिंडीच्या दिशेने जाताना पन्हाळगडाच्या पुसाटी बुरुजाकडून मसाई पठाराच्या दिशेने जावे लागते. पुसाटी बुरुजाकडून खाली उतरताना आपल्याला अर्धवट कच्चा आणि अर्धवट विटांचा रस्ता लागतो त्याच रस्त्यावरून पुढे सुमारे ३ – ४ किमी गेल्यावर आपण तुरुकवाडी नावाच्या गावात पोहचतो. आम्ही तिकडे गेलो असताना भात लावणी चालू होती.

तुरुकवाडीहून आपल्याला म्हाळुंगे या गावी जावे लागते. त्यासाठी आधी साधा नॉर्मल आणि नंतर थोडा तीव्र चढ आहे, पण त्या गावातील लोक ह्या रस्त्याने कायम ये जा करत असतात. म्हाळुंगे ला भरपूर गायी आणि म्हशी देखील आहेत. जर तुम्ही पहाटे तिथे पोहचू शकलात तर तुम्हाला दाट धुके लागते, आम्हाला ते अनुभवायला मिळालं. खरतरं आम्ही गेलो तेव्हा पूर्ण प्रवासातच पाऊस चालू होता, म्हणून दाट धुकं पूर्णच वेळ होतं. म्हाळुंगेहून पुढे आपण जातो मसाई पठारावर, रस्त्यात “बिबट्या पासून सावधान” असे एक दोन बोर्ड लागतात आणि थ्रील वाटतो, पण आम्हाला बिबट्या काही बघायला मिळाला नाही.

चालत चालत आम्ही पुढे मसाई पठारावर येऊन पोहचलो. दूर दूर पर्यंत सपाट जमीन. शेकडो गायी म्हशींचे कळप चाललेले. त्यातील काही गुरं भांडत होती, काही चरत होती तर काही नुसतीच पहुडलेली. हे सगळे पाळलेले होते कि जंगली कुणास ठाऊक. तिरपा पाऊस पडतोय, मगासपर्यंत घनदाट असलेलं धुकं आता बाजूला सावरलंय आणि थोडं थोडं समोरचं स्पष्ट दिसू लागलंय. इतका छान अनुभव असतो न हा…

(हा फोटो तेव्हाचा नाही, ब्लॉगसाठी गुगल मावशीकडून घेतलाय)
पठारावर मसाई मातेचं छोटेखानी देऊळ आहे. आम्ही तिथे दर्शन घेऊन काही वेळ विश्रांतीसाठी बसलो. पन्हाळ्याहून निघून सुमारे १२ ते १५ किमी चालणं झालं होतं. देवळाजवळ ४-५ मिनिटांसाठी थोडं ऊन पडलं होतं, सकाळपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आम्ही गारठून गेलो होतो म्हणूनच बहुतेक उन्हातही शांतता मिळते हे तेव्हा पहिल्यांदाच मला कळलं. ती ४-५ मिनिटं लगेच संपली आणि परत इंद्रदेवानी पावसाचा कहर सुरु केला. लगेचच धुकं पडलं आणि भयंकर पाऊस सुरु झाला. पावसामुळे छोटे छोटे ओढे वाहत होते आणि पठाराच्या कड्यावरून खाली कोसळत होते आणि त्यामुळेच शेकडो छोट्या मोठ्या धबधब्यांची निर्मिती होत होती. आम्ही पठाराच्या कडे कडेनी चालत होतो आणि पुढे एका ठिकाणी अत्यंत आश्चर्यजनक दृश्य पाहिलं. चक्क उलटा वाहाणारा धबधबा…!
पठाराच्या कडेवरून पाणी खाली पडत नव्हतं, तर ते वर आकाशात जात होतं. बऱ्याच वाचकांना हे परीकथेतील प्रसंगाप्रमाणे वाटेल पण हे तिथे खरंच होतं. खालून वर येणाऱ्या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता कि त्यामुळे पाणी खाली पडतच नव्हतं. तर ते परत वर येत होतं आणि त्यामुळे उलटा धबधबा तयार होत होता.

(फोटो क्वालिटी साठी सॉरी… तेव्हा चांगल्या कॅमेराचा फोन नव्हता…)
मसाई पठार ओलांडून पुढे आम्ही पोहचलो निलगिरीच्या जंगलात. घनदाट निलगिरीची झाडे, दाट जंगल, खरा संह्याद्री, मधेच जीव घाबरतो आणि मधेच आनंदही होतो असं विचित्र जंगल. निलगिरी जंगलात दिसणारी जैवविविधता ही अतुल्य आहे. इथे विविध प्रकारची फुलपाखरं, कोळी, कीटक, पक्षी, आणि छोटे प्राणी दिसतात जे आपण रेअरली बघितले असतील. निलगिरीचे जंगल संपल्यावर आम्ही पोहचलो खोतवाडीला…

खोतवाडी हे एक छोटंसं गाव, ७००-८०० लोकसंख्या असावी. या गावात पोहचत आम्हाला संध्याकाळ झाली म्हणून आम्ही विचार केला कि आज इथेच मुक्काम ठोकावा. एक विशिष्ट निरीक्षण आम्ही गावात केलं ते म्हणजे गावात तरुण जास्त आढळलेच नाही गावात होते फक्त वयस्कर लोक आणि लहान मुले. विचारपूस केल्यावर कळले कि येथील सर्व तरुण कामानिमित्त शहरात स्थलांतरित झाले आहेत आणि अकार्यक्षम वृध्द आणि लहान मुलेच फक्त गावात शिल्लक राहिली आहेत. हीच परिस्थिती आहे आपल्या देशातील बऱ्याच गावांची. तरुण सर्व शहरात आणि बाकी सगळे गावात. कसा होणार गावांचा विकास? कसा होईल आपला देश स्वयंपूर्ण? ज्या देशात गावेच स्वयंपूर्ण नाहीत ??? प्रश्नच प्रश्न….
रात्री एका आजीच्या घरी मुक्काम केला. ते कौलारू घर अतिशय सुंदर होतं. शेणाने सारवलेलं, पारंपारिक पद्धतीचं रंगकाम केलेलं. त्यात मातीच्या मोठ्या मोठ्या रांजणा मध्ये धान्य भरून ठेवलं होतं. रात्री आजीने मस्त भाकऱ्या थापल्या आधी तर ज्वारीच्या २-२ भाकऱ्या आम्ही फस्त केल्या पण भूक अनावर झाली होती. आजीला अजून काहीतरी खायला मागितलं तर आजी म्हणाली कि घरात आत्ता जे होतं ते संपलंय पण तिने लगेच शेजारून तांदळाचे पीठ आणून आम्हाला तांदळाच्या भाकऱ्या करून दिल्या. एक दीड भाकरी कसा बसा खाणाऱ्या मी त्या दिवशी ४-५ भाकऱ्या हाणल्या. आणि नंतर जी कडक झोप लागली आहाहाहा…
सकाळी लवकर उठून आज्जीला टाटा बाय बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे दाट जंगल आणि भरपूर ओढे लागले ते सर्व ओलांडत आम्ही जाधववाडी, माळसावडे मार्गे पांढरपाणीला पोचलो.
पांढरपाणी हून पावनखिंडीला जायला सरळ पक्का रस्ता आहे. पण दीड दिवस चालण्याच्या थकव्याने तो पण पार करायला जड जातो. तिथून ४ ते ५ किमी नंतर आपण पोचतो पावनखिंडीला…

इथे पोचलो आणि सगळा शीण निघून गेला. इथे मला प्रकर्षाने जाणवली ती अत्यंत शांतता पण अस्थिरता. बैचेनी. काहीतरी चुकलंय, काहीतरी बरोबर घडलेलं नाहीये. बाजीप्रभूंना शांती मिळाली नाहीये. राजे तर विशाळगडावर पोहचले स्वराज्यही स्थापन झालं. पण आम्हाला ते टिकवता आलं? आम्ही बनू शकलो शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे? आम्ही करू शकतो एखादी घोडखिंड “पावन”? मी आज ६-७ वर्षांनंतर देखील या प्रश्नांची उत्तरं शोधतोय. महाराजच मला त्याचं उत्तर कधी न कधी देतील हे मात्र नक्की…..
