|| सत्यं त्वर्तेन परिशिंचामि ||
(मी सत्याने सिंचन करतो)
गेले एक दोन वर्ष चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे शेतीला सुपीकता व शेतकऱ्याला धीर मिळाला. परंतु ज्या गावांनी याआधीच जलसंधारणाची कामे करून ठेवली होती, त्या गावांना हा पाऊस कितीतरी जास्त फायदा देणारा ठरेल. कारण पाऊस नसतानाही पावसाची तयारी या गावांनी करून ठेवली होती आणि आता या गावांतील भूजल पातळीत आश्चर्यकारक वाढ दिसेल, यात शंका नाही!
पण बऱ्याच गावांमध्ये शासकीय/इतर माध्यमांतून आधीपासूनच कामे होत तर होती, मग इथे का बरं असा बदल दिसणार नाही किंवा दिसत नाही? याचं प्रमुख कारण म्हणजे लोकसहभाग! ज्या गावांनी जलसंधारणाची जबाबदारी स्वतः स्वीकारली, ज्या गावांनी आर्थिक, मानसिक व शारीरिक दृष्ट्या लोकसहभाग केला, जी गावे जलसंधारणाचे काम व्यवस्थित व्हावे म्हणून अहोरात्र झटत होती, तीच गावे आजच्या घडीला सुजलाम सुफलाम झालेली आहेत.
खरंतर, लोकसहभाग हा पाणी विषयक कामासाठी नव्हे तर यामुळे गाव एकत्र येतं म्हणून करायचा असतो. गाव एकत्र आल्यामुळे वाढते ती गावाची अध्यात्मिक शक्ती, आणि हि वाढलेली अध्यात्मिक शक्तीच गावाचा कायापालट करायला कारणीभूत ठरते. असंच काम ग्रामविकासाच्या कित्येत गावांनी गेली दोन तीन वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन केलं व आज गावातच स्वर्गाचा अनुभव त्यांना मिळतोय.
२०१८ साली देवगिरी प्रांतातील २६ गावांनी जलसंधारण प्रकल्प राबवला. त्यात नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. सर्व गावे मिळून जवळपास ३० किमी चे काम झाले व त्यात १६१ कोटी लीटर पाण्याचे संधारण झाले. तसेच २०१९ साली २८ गावांमध्ये अश्याच पद्धतीची कामे करण्यात आली. २०१९ साली तर गावांमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली होती! हातात असलेला निधी देखील संपायला आला पण गावांनी दाखवलेली एकी, जिद्द आणि दृढ निश्चयाचा परिणाम म्हणून या गावांमध्ये १९० कोटी लीटर पाण्याची बचत झाली. आज हि सर्वच गावे सुजलाम-सुफलाम आहेत. तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली, गावांतील पाण्याचे टंकर बंद झाले, शेतीच्या पिक परिस्थितीत बदल झाले व पाण्यासाठी गावे निश्चिंत झाली. आता सुधारलेल्या शेतीमुळे गावातील तरुण विविध शेती आधारित उद्याग गावात सुरु करू लागलेत. हळू हळू गावाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यातही याची मदत होईल. गाव एकत्र आल्यामुळे काय फायदा होतो हे यांनी बघितलय, म्हणूनच आता फक्त जलसंधारणासाठीच नव्हे तर गावाच्या विकासातील विविध विषयांसाठी गाव एकत्र येऊ लागलय आणि एकीचं बळ सगळीकडच दिसतंय. याचं गावांप्रमाणे इतरही गावांनी जलसंधारण करण्यासाठी लोकसहभाग करावा. कारण जलसंधारणातून मनसंधारण करायचं असेल तर लोकसहभाग केल्याशिवाय पर्याय नाही.
याच जलसंधारण कार्यात खारीचा वाटा उचलताना मला आलेला अनुभव,
करण्या जलसंधारण | झालो आम्ही एक ||
कार्य ते नेक | विठोबाचे || १ ||
सूत्र तयाचे सोपे आहे | लोकसहभाग |
एकीची ती जाग | ग्रामांतरीच्या || २ ||
विकास गावाचा | कठीण आणि सोपा ||
भेदाचा तो खोपा | दूर ठेवा || ३ ||
सांगुनी हो गेले | दास तुकडोजी ||
खेमास काळजी | शाश्वताची || ४ ||
