

सांधण व्हॅली ला जाण्यासाठी आम्ही नाशिक हून निघालो एक कार आणि दोन बाईक. एका बाईक वर मी आणि आशिष दादा होतो. नाशिकचा परिसर तसाही झाडे असलेला आणि थंड आहेच म्हणून तिथून कुठेही फिरायला जाणं हे निसर्ग सौंदर्य बघणं असंच असतं.
नाशिक हून सांधण व्हॅली ला जाण्यासाठी घोटी – शेंडी (भंडारदरा)-उडदावणे-साम्रद असा रस्ता आहे. साम्रद या गावापाशीच हि व्हॅली किंवा घळ आहे.
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांधण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. म्हणूनच उन्हाळ्यात आम्ही सांधण ला गेलो.

दरीची सुरुवात होण्याआधी साम्रद गावापासून पुढे झाडे झुडुपे लागतात.
एक छोटेखानी जंगलच. दरीत जाण्याआधी इथे बसून छानपणे नाश्ता करता येईल अशी जागा.
इथून पुढे दरीत उतरण्यास सुरुवात होते.

घळीच्या सुरुवातीलाच आपला अश्मयुगात प्रवेश होतो आणि मोठे मोठे दगड दिसू लागतात. घळीमध्ये थोडासा प्रवेश केला कि लगेच अतिशय तीव्र उतार आहे तो पार करताच साधारण दगडांचा रस्ता सुरु होतो आणि आपल्या समोर असतात दोन भल्या मोठ्या ३०० ते ४०० फुट उंच भिंती ज्यांच्यातील अंतर साधारण १० ते १५ फुटापासून सुरु होते पण पुढे पुढे ते निमुळते होत जाते एका टप्प्याला तर अवघे ५-६ फुट अंतर राहते.
दरीत आम्ही भर दिवसा उन पडलेले असताना प्रवेश केला होता. पण आत संपूर्ण सावली आणि त्या प्रचंड मोठ्या भिंतींची शांतता बहुदा हि शांतताच आहे जी निसर्गप्रेमींना आणि भटक्यांना अशा ठिकाणी खेचून घेते. मधूनच दरीत कुठून तरी उन येते आणि तोच दरीतला ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.
चालत चालत आम्ही दरीच्या मध्यावर पोहोचलो. वाटेत २ पाण्याचे साठे लागतात आम्ही तिथे गेलेलो असताना कमरेएवढं पाणी होतं ते दोन्ही साठे पार करायला वेगळीच मज्जा येते. मध्येच भिंतीना कपारी आढळतात थोडसं बसावं वाटलं कि त्या कपारींमध्ये शांत बसता येते.

हळू हळू दुपारच्या ३-४ वाजेपर्यत आम्ही दरीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो.
तिथून पुढे दिसणारा भला मोठा कोकण कडा आपल्याला आपल्या शुल्लक आयुष्याची, आपल्या शुल्लक क्षमतेची आठवण करून देतो.
त्या शेवटच्या टोकावर बसून पलीकडे आयुष्यभर बघत रहावसं वाटतं.
संध्याकाळ होत होत आम्ही दरीतून बाहेर निघालो, विशेष म्हणजे जाताना जेवढी मज्जा येत होती तेवढीच मज्जा आणि तेवढाच नवीन अनुभव परत येताना देखील होत होता. दरीच्या मुखाजवळ आम्ही परत आलो आणि विश्रांतीसाठी थोडावेळ बसलो. आम्हा सर्व भावंडांच्या बसल्या बसल्या गप्पा सुरु झाल्या आणि जोक वर जोक मारणे सुरु झाले. पुकार ते शुकार ते शिकार असे सर्व जोक झाले (ज्यांना समजलं त्यांच्यासाठीच फक्त 😜 😜 😜 )
मग आम्ही बॅक टू पॅव्हिलियन यात्रा सुरु केली. बाईक वर जात जात दिवसभराच्या सर्व आठवणी मनात साठवत सगळे निघालो. हळू हळू अंधार पडला आणि शेजारचे जंगल काजव्यांनी लखलखून उठले जणू काही जंगलात लायटिंग लावलेली होती . काजव्यांच्या त्या चमकण्या मध्ये एक छान अशी लय होती. आवाज जरी येत नसला तरी ते संगीत माझ्यासाठी आजपर्यंत ऐकलेलं सर्वात समधुर संगीत होतं. त्या काजव्यांना टाटा करत आम्ही नाशिक ला परतलो.
हा सांधण दरीचा अविस्मरणीय प्रवास मला खूप काही शिकवून गेला. पृथ्वीवर पडलेली एक साधारण भेग किती छान अनुभव देऊ शकते तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्तीतरी दऱ्या या सुंदरच असतात बस आपण त्यांच्याकडे एक अनुभव म्हणून बघितलं पाहिजे. असा अनुभव घेतला तर आपल्यासाठी शेवटच्या टप्प्यात निसर्ग काजव्यांचे संगीत ऐकवते…
